करमाळा (अशोक मुरूमकर) : ऊस गाळप हंगाम सुरु झाला असून परिसरातील सर्व साखर कारखाने सुरु झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर ऊस वाहतूक करणारी वाहने दिसू लागली आहेत. या व वाहनांमुळे अनेकदा अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनखाली करमाळा पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे.
बारामती ऍग्रो, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, अंबालिका, कमलाई या कारखान्याची ऊस तोड यंत्रणा सक्रिय झाली आहे. कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर सध्या रस्त्यांवर दिसत आहेत. अशा वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे. यातून होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडियावर जागृती सुरु आहे.
‘अपघात टाळा ऊस वाहतूक सुरु झाली आहे’ अशा मथळ्याखाली एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘वाहन चालवताना विशेष काळजी घ्या, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करताना काळजी घ्या, वाहनांचा वेग मर्यादित ठेवा, चढ व उताराला ऊसाच्या ट्रॅक्टरच्या मागे चालू नका, सुरक्षित अंतर ठेऊन दक्षता घ्या, वाहतुकीचे नियम पाळा’, असे आवाहन पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी केले आहे.
ऊस वाहतूकदारांना सूचना
- रस्त्याच्या एका बाजुने वाहतूक करावी. (मधोमध न चालविता)
- ट्रॅक्टर चालकांनी रोडवर ओव्हरटेक करण्याची स्पर्धा करू नये
- गाणी कमी आवाजात ठेवावीत
- रस्त्यावर दोन ट्रॅक्टरच्यामध्ये किमान अंतर राखून वाहतूक करणे. (एकमेका मागे रांगेत वाहतूक न करणे )
- उठीसाठी चाकांना लावलेले मोठे मोठे दगड रस्त्याच्या बाजूला ठेवतात.
- दुचाकीला दगड लागून अपघात होतात ते टाळावेत
