करमाळा (सोलापूर) : अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारकडून पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरु केले आहे. मात्र ज्यांचे पिक कर्ज, मुद्रा लोण, किसान क्रेडिट कर्ज थकीत आहे व एनपीएमध्ये खाते गेले आहे, अशा शेतकऱ्यांच्या रक्कमा बॅंकांनी अडवून ठेवल्या आहेत, असा आरोप युवासेनेचे शंभूराजे फरतडे यांनी केला असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी सदरचा अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देणार असल्याचे सांगीतले. याबरोबर फार्मआयडी नवीन व पेंडिंगसाठी करमाळा तहसील येथे कैम्प घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकार एकीकडे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देत आहे तर दुसरीकडे मदत म्हणून दिलेली रक्कम कर्ज थकीत आहे म्हणून गोठवून ठेवत आहे. ठाकरे सेनेचे युवासेना तालुकाप्रमुख फरतडे म्हणाले, ‘चार दिवसांत सदर रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन करणार आहे. मे मध्ये झालेल्या अवकाळी व सप्टेंबरमधील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खरिप व रब्बीचे नियोजन कोलमडे आहे. नदी काठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. हेक्टरी ५० हजाराची व सरकट कर्ज माफीची मागणी असताना मिळालेली मदत तुटपुंजी त्यातच थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होवून देखील काढता येत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.’
