करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शारद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे आहेत. त्यांनी १६ तारखेला अर्जही दाखल केला आहे. त्यानंतर मोहिते पाटील समर्थकांकडून व्यक्तिगत भेटी घेऊन प्रचार सुरु झाला आहे. मात्र अजूनही जाहीरपणे प्रचार सुरु नसून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाचे पदाधिकारीही प्रचारात दिसत नाहीत, असे चित्र आहे.
मोहिते पाटील यांना करमाळ्यातून मताधिक्य देण्यासाठी बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांनी रणनीती आखली असल्याचे सांगितले जात आहे. ते स्वतंत्र समांतर प्रचार यंत्रणा देणार आहेत. मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांची अजूनही करमाळ्यात एकत्रित बैठक झालेली नाही. मोहिते पाटील समर्थक मात्र व्यक्तिगत गाठीभेटी घेऊन प्रचार करत आहेत. उमेदवारी अर्ज छाननी झाल्यावर प्रचाराला गती येईल, असे सांगितले जात आहे. माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक देखील २६ तारखेला करमाळ्यात शरद पवार यांची सभा झाल्यानंतर प्रचारासाठी अत्यंत सक्रिय होतील, अशी शक्यता आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे मोहिते पाटील व महायुतीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत होईल, असे चित्र आहे. ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून विजयी होण्यासाठी कोण कशी समीकरणे आखात आहेत, याकडे सर्वांचे लक्ष आहे. निंबाळकर यांच्या बाजूने करमाळ्यात जगताप गट, बागल गट व शिंदे गट आहेत तर मोहिते पाटील यांच्याकडून पाटील गट आहे.
भाजपनंतर शिवसेनेतही राजीनामा नाट्य! करमाळ्यात मोहिते पाटलांनी ‘तुतारी’ घेताच दिला राजीनामा