करमाळा (सोलापूर) : नवी दिल्ली येथे रामलीला मैदानावर जुनी पेन्शन योजनेसाठी शंखनाद आंदोलन होणार आहे. गांधी जयंतीच्या दिवशी देशातील 2005 नंतर नियुक्त हजारो कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यासाठी सोलापुरातून ही एक हजाराहून अधिक सरकारी, निमसरकारी कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सोलापूरचे जिल्हा नेते तात्यासाहेब जाधव यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, कृषी, बांधकाम, महानगर पालिका नगरपालिका कर्मचारी, पोलिस कार्यालयीन कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक आदी विविध विभागांतील लाखों कर्मचारी या आंदोलनासाठी दिल्ली येथे एकत्र येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती करुन पेन्शन योजनेत सुधारणा करण्यासाठी समिती नेमली, पण ही समिती निहीत वेळेत अहवाल देऊ शकली नाही. महाराष्ट्र सरकारने पुन्हा या समितीला मुदतवाढ दिली आहे , त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधु व उपाध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या पेन्शन शंखनाद आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे, प्रशांत लंबे, किरण काळे,नमिता शिर्के,साईनाथ देवकर, आशिष चव्हाण, सचिन क्षिरसागर, अर्जुन पिसे, कृष्णदेव पवार, धनंजय धबधबे, दत्तात्रय गोरे, चंद्रकांत सुरवसे, गणेश कुडले, विजय राऊत, मोहन पवार, सैदाप्पा कोळी, उमेश सरवळे , संदीप गायकवाड, संजय ननवरे, सतीश लेंडवे, विठ्ठल पाटील, शिवानंद बारबोले, ज्ञानदेव चव्हाण, सतीश चिंदे, बाबासाहेब घोडके आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.