करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील आळजापूर येथे सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. या निर्णयाचा ठराव करण्यात आला असून या ठरावाची प्रत तहसीलदार यांना देण्यात आली आहे. याशिवाय करमाळा तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या साखळी उपोषणालाही पाठींबा देण्यात आला आहे. यावेळी आळजापूर येथील मराठा समाज बांधव व बहुजन समाज बांधव उपस्थित होते.
मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण जाहीर होईपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गावातील सर्व समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. करमाळा तालुक्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावातील समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे ठराव केले जात आहेत. याशिवाय साखळी उपोषणातही सहभागी होऊन रोज हजारो बांधव पाठींबा देत आहेत.