करमाळा (सोलापूर) : ‘डोळ्यांचे विकार हे केवळ दुर्लक्षितपणामुळे व योग्य ती काळजी न घेतल्यामुळे उद्भवतात. हे टाळण्यासाठी डोळ्याच्या आरोग्यविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे, त्यामुळे भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येत नाही’, असे प्रतिपादन नेत्रतज्ञ डॉ. गीता मगर यांनी केले आहे. करमाळा तालुक्यातील चिखलठाण ग्रामपंचायत व इंदापूर येथील मगर हॉस्पिटलच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिर झाले. यामध्ये २१५ रुग्णांची तपासणी करण्यात आले.
चिखलठाणसह परिसरातील रुग्णांसाठी हे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले होते. याचे उद्घाटन सरपंच धनश्री गलांडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, मकाई सहकारी साखर करखान्याचे संचालक दिनकर सरडे, चिखलठाण सोसायटीचे अध्यक्ष विकास गलांडे, उपसरपंच आबा मारकड, ग्रामपंचायत सदस्य हेमंत बारकुंड, मच्छिंद्र सरडे, आदिनाथ सरडे, प्रमोद गव्हाणे उपस्थित होते.
माजी उपाध्यक्ष बारकुंड, संचालक सरडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाल गव्हाणे यांनी तर आभार सतीश बनसोडे यांनी मानले. ग्रामपंचायत सदस्य आनंद पोळ, पुष्पा चव्हाण, संभाजी कांबळे, संतोष सरडे, धनाजी मारकड, फिरोज तांबोळी यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.