करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे बँक व पोस्ट खात्यात पैसे सोडण्यासाठी सध्या ekyc ची प्रक्रिया केली जात आहे. मात्र सर्व्हर डाऊन होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत असून रात्री सर्व्हर व्यवस्थित चालत असल्याचे सांगितले जात असल्याने रात्रभर शेतकरी जागरण करत आहेत.
राज्यात गेल्यावर्षी अत्याल्प पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. शेतातील पीक पाण्यामुळे उगवली नाहीत. अशास्थितीत शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून याद्या तयार करण्यात आल्या होत्या. महसूल विभागाकडून झालेल्या या याद्यानुसार अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
‘आपले सरकार’मध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड व बँक किंवा पोस्ट खाते लिंक करून व्हेरिफाय केले जात आहे. एकाचवेळी सर्वत्र हे काम सुरु असल्याने सर्व्हर डाउनच परिणाम होत आहे. अनुदान मिळण्यासाठी ही ekyc महत्वाची असून शेतकऱ्यांना जागेवर सुविधा मिळावी म्हणून ‘आपले सरकार’चे काही प्रतिनिधी लॅपटॉप व फिंगर प्रिंट स्कॅनर (बायोमेट्रिक स्कॅनर) घेऊन ग्रामीण भागात जात आहेत. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने वेळेत ekyc होत नाही. अनेक शेतकरी रात्रभर जगत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.