करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यापेक्षा शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर आणि वेळेवर उसाचे बिल यामुळे अंबालिका साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी करमाळा तालुक्यातील ऊसाची नोंद वाढली आहे. या हंगामात कारखाने कधी सुरु होणार हे निश्चित नसले तरी अंबालिकाकडे ऊस देण्यास शेतकऱ्यांचे प्राधान्य असल्याचे दिसत आहे.
२०२२- २३ मध्ये कारखान्याने आतापर्यंत चार टप्यात टनाला २८६७ रुपये दिले आहेत. उसाला १२.१० रिकव्हरी आहे. यावर्षी अंबालिका कारखान्याकडे जाणारे रस्ते चांगले झाले आहेत. आणि विस्तारीकरण यामुळे कारखाना आणखी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ऊस गाळप करेल, असे नियोजन आहे.
करमाळा तालुक्यात कमलाई, आदिनाथ, मकाई व विहाळ हे साखर कारखाने आहेत. ऊसाला जादा दर आणि वेळेत पैसे मिळत असल्याने अंबालिका कारखान्याला शेतकऱ्यांचा मोठ्याप्रमाणात ऊस गाळपासाठी जात आहे. गेल्यावर्षी तालुक्यातून ४ लाख ९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. कारखान्याकडे ४ हजार ८०९ हेक्टर उसाची नोंद झाली होती. तर ५ हजार २७ हेक्टर ऊस कारखान्याने गाळप केला होता. यावर्षी कारखान्याकडे ५ हजार ५५० हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे.
करमाळा तालुक्यातील ऊस गाळपाचे नियोजन कारखान्याने केले असून मांगी/ करमाळा, जेऊर, वाशिंबे व जिंती हे गट आहेत. करमाळ्यात कारखान्याचे कार्यालय देखील असून यावर्षी ऊस गाळपासाठी अडचण येणार नाही, असे सांगण्यात येत आहे. मुख्य संचलन अधिकारी जंगल वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश तावरे, जनरल मॅनेजर सुरेश शिंदे, केन मॅनेजर विठ्ठल भोसले व ऊस विकास अधिकारी श्री. शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी हा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
करमाळा तालुक्यात मांगी/ करमाळा गटात १००२ हेक्टर, जेऊर गटात ६८९ हेक्टर, वाशिंबे गटात २५३२ हेक्टर व जिंती गटात १५८२ हेक्टर उसाची नोंद झाली आहे. यामध्ये आडसाली १३७१ हेक्टर, पूर्व हंगामी ६२० हेक्टर, सुरु ४८५ व खोडवा ३०७२ हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे.
कारखान्याला भेट…
अंबालिका कारखान्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून या कारखान्याला सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे, पत्रकार विशाल घोलप, पत्रकार अशोक मुरूमकर, श्री. गलांडे यांनी नुकतीच भेट दिली असून या परिसराची पहाणी केली आहे. योग्य नियोजन आणि नियमांचे पालन केल्याने कारखान्याची कशी प्रगती होते हे हा कारखाना पाहिल्यानंतर येते. इतर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी याचा आदर्श घेणे आवश्यक आहे.