Scrap sale tender process of Adinath Karkhana Karmala canceled again

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील शेतकऱ्यांचा अस्मिता असलेला श्री आदिनाथ adinatha karkhana सहकारी साखर कारखाना अवसायनात (Liquidation) निघण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा कारखाना वेळीच वाचवने आवश्यक असून त्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन करतानाच हा कारखाना अडचणीतून कसा बाहेर काढण्यासाठी कोणाकडे काही उपाय असेल तर सांगा, असे जाहीरपणे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अकलुजमध्ये ‘शिवर्तन’वर बैठकीत पाटील, बागल व जगताप गटाच्या कार्यकर्त्याना विचारले. दरम्यान ‘तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असल्याचे’ माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गटाच्या वतीने विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी सांगितले. आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरीदास डांगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत प्रमुख नेत्यांच्या निर्णयाला सहमती दिली.

अकलुज येथे ‘शिवर्तन’वर मोहिते पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. ही बैठक का बोलावली असेल याची सर्वांमध्येचे उत्सुकता होती. ही बैठक सुरू होण्यापूर्वी आमदार मोहिते पाटील व माजी आमदार पाटील, जगताप व घुमरे यांच्यात प्रथम काहीवेळ चर्चा झाली. त्यानंतर बैठक सुरू होताच आमदार मोहिते पाटील यांनी ही बैठक ‘फक्त आणि फक्त आदिनाथ’साठी असल्याचे सांगितले.

मोहिते पाटील म्हणाले, ‘आदिनाथ कारखान्यावर एमएसएसी व एनसीडिसीचे कर्ज आहे. त्याशीवाय इतर बँकांचेही कर्ज आहे. 230 कोटी कर्ज या कारखान्यावर असून 31 मार्चपूर्वी बँकेचे पैसे दिले गेले नाही. तर बँक या कारखान्यावर कारवाई करू शकते. त्यामुळे आपण याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. राजकारण बाजूला ठेऊन हा कारखाना वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. हा कारखाना वाचवताना आम्ही आमच्या कोणत्याही कारखान्याकडे तो घेणार नाही. तर तो सहकारी ठेऊनच त्याला आडचणीतून बाहेर काढू. मात्र या कारखान्याचे नुकसान होऊ देणार नाही.’

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आदिनाथमध्ये कोणी काय केले? कोणामुळे तो अडचणीत आला ते आता काढण्याची गरज नाही. हा कारखाना बाहेर कसा काढता येईल यावर सर्वानी लक्ष द्यावे.’ आमदार मोहिते पाटील यांनी सुरुवातीलाच आदिनाथची स्थिती सांगितली. त्यानंतर डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर घुमरे यांनीही मनोगत व्यक्त करताना ‘तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमची सहमती आहे. याबाबत मी दिग्विजय बागल यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याचे सांगितले.’ माजी आमदार पाटील म्हणाले, ‘राजकारण करण्यासाठी आपल्याला पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती आहे. कारखाना सोडून आपण इतर ठिकाणी राजकारण करू, मात्र आदिनाथमध्ये राजकारण करणे योग्य नाही. मोहिते पाटील हा कारखाना सहकारी ठेऊनच वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या मागे उभा राहू.’

माजी आमदार जगताप म्हणाले, ‘आदिनाथचे नुकसान का झाले हे सर्वांच्या समोर आहे. मी सत्तेत असताना कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्याना जिल्ह्यात सर्वाधिक दर दिला. मात्र तेव्हाही काही संचालक माझ्यापासून दूर गेले. मी फक्त शेतकऱ्यांचे आणि कारखान्याचे हित पाहिले. मात्र नंतर सत्ता बदल झाली. पुढे या कारखान्याचे नुकसान झाले, असे असतानाही तुम्ही निस्वार्थीपणे हा कारखाना वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहात. सभासद शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे.’ अकलुज येथील बैठकीवेळी धैर्यशील मोहिते पाटील, कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले, देवी गटाचे कन्हैयालाल देवी, आदिनाथ बचाव समितीचे डॉ. वसंत पुंडे, माजी सभापती अतुल पाटील, देवानंद बागल, प्रा. शिवाजी बंडगर, आमरजीत साळुंखे, भाजपचे जगदीश अग्रवाल आदी उपस्थित होते. 

कोण काय म्हणाले याचे सर्व व्हिडिओ https://www.youtube.com/@kaysangtaa9471

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *