करमाळा (अशोक मुरूमकर) : सावडी येथील उपसरपंचावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाला वेगळे वळण लागले आहे. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी बोलवलेल्या विशेष सभेला एकही ग्रामपंचायत सदस्य हजर राहिले नाहीत. त्यामुळे हा ठराव निष्फळ ठरला. सभेपूर्वी एका महिला सदस्याला पळून नेले होते. त्यात करमाळा पोलिसात बेपत्ता नोंद झाली होती. मात्र नाट्यमय घडामोडीत उपसरपंच व बेपत्ता झालेल्या सदस्या सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांसमोर हजर झाल्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे उपस्थित होते.
सावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र एकाड हे विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत 10 सदस्यानी 28 जुलैला अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर आज (गुरुवारी) सदस्याची सभा बोलावली होती. मात्र या सभेला एकही सदस्य हजर राहीला नाही. या ग्रामपंचायतीत ११ सदस्य आहेत. त्यातील १० सदस्यांनी उपसरपंच एकाड यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव मंजूर की अमंजूर हे ठरवण्यासाठी प्रभारी तहसीलदार जाधव यांनी सभा बोलावली होती.
सभेपूर्वीच येथे मोठ्या राजकीय घडमोडी घडल्या. एकूण सदस्यांपैकी सिंधु ठोंबरे (वय 65) यांचे अपहरण झाले असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर आणखी एक सदस्य उपसरपंच एकाड यांच्याबरोबर होता. त्यामुळे ही बैठक झाली नाही. इतर सदस्यही या सभेला हजर राहिले नाहीत. सभेची वेळ झाल्यानंतर पोलिसात नोंद झालेल्या ठोंबरे व उपसरपंच एकाड हे एकाच गाडीत सर्वांसमोर पोलिस ठाण्यात आले. तेव्हा संबंधित ग्रामपंचायतीच्या सदस्या ठोंबरे यांची मुलगी व मुलगा तेथे हजर होता. गाडीतून उतरल्याबरोबर ‘मी माझ्या इच्छेने गेले’ असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांना पोलिसांनी सुरक्षा कडे टाकून त्यांना पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्यासमोर हजर केले. त्यानंतर त्यांचा जबाब घेण्यात आला. हा जबाब काय आहे ते लवकरच समजेल. यावेळी शिंदे, बागल व पाटील गटाचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचे तालुकाध्यक्ष चिवटे यांच्या उपस्थितीच्या यावेळी चर्चा होती. हा ठराव बरगळेल अशी चर्चा यावेळी होती.
उपसरपंच एकाड व शेळके यांच्यात हमरीतुमरी
सावडीतील राजकीय घडामोडीवर करमाळा पोलिसांचे बारीक लक्ष होते. ठराव दाखल केलेले व विरोधकांची येथे गर्दी होती. त्यामुळे पोलीसही सतर्क होते. पोलिस निरीक्षक गुंजवटे यांच्या कॅबिनपासून बाहेर आल्यानंतर पोलिसांसमोरच उपसरपंच एकाड व सत्ताधारी गटाचे शेळके यांच्यात हमरीतुमरी झाली. प्रसंगावधान राखत सहायक पोलिस निरीक्षक संतोष देवकर यांनी दोघानाही समज दिली. आणि शांतता निर्माण झाली.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
राजकीय घडमोडी घडत असताना पोलिस निरीक्षक गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवकर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर, पोलिस हवलदार अजित उबाळे आदींनी वातावरण बिगडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली.