करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषद व करमाळा पंचायत समिती अंतर्गत 2023- 24 मध्ये जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत ‘डीबीटी’ योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शाळेतील मुलींना सायकल योजना व शेतकरी महिला, शेतमजूर महिला व गरजू लाभार्थी यांना व्यवसायाभिमुख बनविण्याण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहने करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.
पंचायत समिती स्तरावर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीतील मुलींना सायकल खरेदीसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. यासाठी एक लाख २० हजार रुपयाचा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, मुख्याध्यापक यांचा शाळा सोडल्याचा दाखला अशी कागदपत्रे लागणार आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी 75 टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे.
ग्रामीण भागातील विधवा महिलांच्या मुलींना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील पिको फॉल मशीन खरेदीसाठी 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणीसाठी 90 टक्के अनुदान, ग्रामीण भागातील महिलांना कुक्कुटपालन खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान, ग्रामीण भागातील अनुसूचित जाती महिलांना पिठाच्या गिरणीसाठी 90 टक्के अनुदान व ग्रामीण भागातील अनुसूचित जाती महिलांना पिको फॉल खरेदीसाठी 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राऊत यांनी दिली आहे.