करमाळा (सोलापूर) : वाशिंबे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मनीषा नवनाथ झोळ व ग्रामसेवक आर. जे. गाडेकर यांच्यावर ११ लाख १५ हजार ३५६ रुपयांचा आर्थिक गैरव्यहावर केल्याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अविनाश थोरात यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीस अनुसरून १४ पाणी जबाब जोडण्यात आला आहे. माजी सरपंच झोळ या आमदार नारायण पाटील यांच्या समर्थक आहेत. प्रताप झोळ यांनी २०१७ ते २०२२ दरम्यान जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यहावर झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून याबाबत करमाळा पोलिसात तक्रार दिली आहे.
वाशिंबे ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच झोळ व ग्रामसेवक गाडेकर यांनी गैरव्यहावर व अनियमिततेबाबत तक्रार केली होती. ग्रामसेवक गाडेकर यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये टी. एस. येडे यांच्याकडे पदभार दिला. तेव्हा त्यांनी ग्रामनिधी, ग्रामीण पाणी पुरवठा निधी, १४ व १५ वा वित्त आयोग्य रोजकीर्द, पासबुक व चेकबुक, एमआरजीएस व पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनाचे कॅशबुक- पासबुक- चेकबुक हस्तांतरित केले. संपूर्ण पदभार हस्तांतर न करता जुलै २०२३ मध्ये गटविकास अधिकाऱ्यांना लेखी त्यांनी कळवले. अहवालात ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अनियमितता, अनियमित कामकाज केले असल्याचा आरोप आहे.
आरोग्य विषयक बेड, रॅक, फर्निचर खरेदी ९९ हजार ९९९, ग्रामपंचायत कार्यालयात फर्निचर खरेदी ४९ हजार ९७४, मेडीक्लोअर खरेदी ४९ हजार ९८०, आरओ प्लांट खरेदी २ लाख ९७ हजार ८०० रुपये यामध्ये गैरव्यहावर झाला आहे. याला तत्कालीन सरपंच झोळ व ग्रामसेवक गाडेकर हे जबाबदार आहेत. माजी सरपंच झोळ यांनी ९ मे २०२५ रोजी दिलेला खुलासा समाधानकारक नाही. त्यांनी जोडलेले पुरावे अपूर्ण आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. आचारसंहिता कालावधीत प्रशासक असताना सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगनमत करून १ लाख ९९ हजार ९२५ व ४९ हजार ९८० एवढी रक्कम काढून अपहार केला. एकूण ११ लाख १५ हजार ३५६ रुपयांची व्याजासह वसुली करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.