करमाळा (अशोक मुरूमकर) : आषाढी एकादशीनिमित्त करमाळामार्गे पंढरपूरला हजारो वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून पायी चालत जात आहेत. यामध्ये नेवासा तालुक्यातून पहिल्यांदाच २१ दिंड्यांमधील वारकरी एकत्र करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळा सुरु झाला आहे. या सोहळ्यात साधणार नऊ हजार वारकरी सहभागी झाले आहेत.
श्रीगुरु राऊतबाबा यांच्या पुढाकारातून नेवासा तालुक्यातून पंढरपूरच्या दिशेने हा पालखी सोहळा येत आहे. ज्याप्रमाणे आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरला येत आहे. त्याचप्रमाणे हा श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा मार्गस्थ झाला आहे. परिसरातून निघणाऱ्या वेगवेगळ्या २१ दिंडया एकत्र झाल्या आणि हा सोहळा निघाला. १८ जूनला या सोहळ्याचे गंगापूर तालुक्यातील जाखमाथा येथील श्री विठ्ठल आश्रम परिवार येथून प्रस्थान झाले. आज (शनिवारी) श्रीदेवीचामाळ येथे या पालखीचा मुक्काम आहे.
या पालखी सोहळ्यात पुढे अश्व मागे नगाडा त्यानंतर खांद्यावर भगवा पताका असलेले पांढऱ्या शुभ्र पोशाखातील डोक्यावर टोपी असलेले वारकरी असे सर्व नियम पाळत वारकरी चालतात. पालखीच्या पुढे तीन व मागे १९ दिंड्यांच्या माध्यमातून वारकरी चालत आहेत. रस्त्याने अढथळा येऊ नये म्हणून चोपदार असतात. खाक्या वर्दीतील काही सुरक्षारक्षक रस्त्यावरील चारचाकी वाहनांना वाट काढून देतात.
इतर दिंड्यांमध्ये जसे भजन, भारूड, अभंग, गवळण असे धार्मिक कार्यक्रम या पालखी सोहळ्यात होतात. हा सोहळा यशस्वी व्हावा म्हणून प्रमुखांनी सहभागी होणारांसाठी काही नियम व अटी ठेवल्या आहेत. ‘ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली ते ठिकाण म्हणजे नेवासा. आणि तेथून आळंदी येथून जसा पालखी सोहळा निघतो तसाच पालखी सोहळा निघावा असा मानस श्रीगुरु राऊतबाबा यांनी व्यक्त केला. त्यानंतर हा सोहळा सुरु झाला आहे’, असे वारकरी सांगत आहेत.