करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (मंगळवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली आहे. माजी आमदार शिंदे हे अजित पवार यांचे समर्थक आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. निवडणूक निकालानंतर त्यांनी पहिल्यांदाच पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
माजी आमदार शिंदे हे पवार यांचे समर्थक आहेत. करमाळ्यात ते कार्यकर्त्यांच्या आग्रहाने अपक्ष निवडणूक रिंगणात होते. अजित पवार यांनी स्वतः करमाळ्यात ‘लाडकी बहीण’ मेळावा घेतला होता. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. येथे महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल होते. त्यांना ४१ हजार मते मिळाली. तर शिंदे यांना ८१ हजार मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांचा येथे विजयी झाला. त्यांना ९६ हजार मते मिळाली आहेत. बागल आणि शिंदे यांच्या मतविभागणीचा फटका येथे बसला असल्याचे बोलले जात आहे.
पवार यांनी शिंदे यांना करमाळ्याचा विकास करण्यासाठी मोठा निधी दिला होता. मात्र स्थानिक राजकारणात त्यांचा पराभव झाला. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. मात्र या भेटीचे फोटो समाज माध्यमात व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. फेसबुक वॊलवर एक पोस्ट आली असून त्यामध्ये म्हटले आहे की, ‘आज मुंबई येथे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाचे व बारामती मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले’. यावेळी निमगावचे (टें) सरपंच यशवंत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील भिमानगरकर आदी उपस्थित होते.