करमाळा (सोलापूर) : ‘माजी आमदार संजयमामा शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीचा फोटो स्वार्थापोटी व्हायरल करत आहेत’, असा आरोप आमदार नारायण पाटील यांचे समर्थक सुनील तळेकर यांनी केला आहे.
तळेकर म्हणाले, ‘उजनीचे पाणी सीनेत सोडल्यानंतर त्या पाण्याचा विसर्ग कमी होऊ नये व पाणी गळती थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी बोगदा व सीने काठच्या वीजपुरवठ्यात कपात केली होती. हा निर्णय काही दिवसापुरता होता. तरीही आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवले व चर्चा केली. यानंतर खंडीत वीजपुरवठा दोन तासावर आला व नंतर चार तासावर आला. यावेळी माजी आमदार बबनदादा शिंदे यांनीही निवेदन दिले होते. पण माजी आमदार शिंदे यांना काहीही देणंघेणं नव्हतं. आमदारांच्या निवेदनाचा विचार करुन जिल्हाधिकारी यांनीच वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे आदेश महावितरणला दिले. यानंतर माजी आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यात आदिनाथच्या निवडणुकीत कोण कोणाच्या जवळचा याची चर्चा सभासद करु लागल्याने वीज प्रश्नाचे निमित्ताने त्यांनी पवार यांची भेट घेतली. त्यांना केवळ निवेदन देण्यापुरताच वेळ त्यांनी दिला’, असे दावा तळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.