करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) शिर्डी येथील ‘नव- संकल्प शिबीर २०२५’ मध्ये करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचीही उपस्थिती होती. सुरुवातीपासून माजी आमदार शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेते मानतात. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ते काम करतात. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली होती. शिर्डीत झालेल्या शिबिराला ते उपस्थित होते. त्यामुळे आता पुनः मतदारसंघात ते सक्रिय होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

माजी आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा मतदारसंघात तीन हजार कोटींची विकास कामे मंजूर केली होती. त्यातील अनेक कामे सुरु झाली आहेत. मात्र स्थानिक राजकारणात त्यांचा पराभव झाला. हा पराभव स्वीकारून ते पुनः कामाला लागले आहेत. शिर्डीतील शिबिराला ते पूर्णवेळ उपस्थित होते. अनेक महत्वाच्या नेत्यांशी त्यांनी संवादही साधला असल्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, खासदार सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भूजबळ, धंनजय मुंडे आदी या शिबिराला उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी आमदार शिंदे यांचा गट उतरणार आहे. मात्र स्वबळावर की स्थनिक गटाशी युती करणार हे अद्याप स्पष्ट नाही. गटाच्या प्रमुखांकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नाही. मात्र स्थानिक पदाधिकारी शिंदे गटाने निवडणुका स्वबळावर लढाव्यात असे बोलत आहेत. ऍड. शिवराज जगताप यांनी याबाबत नुकतेच प्रसिद्धिपत्रकही काढले होते. येणाऱ्या काळात शिंदे गटाची काय भूमिका असेल हे पहावे लागणार आहे.