करमाळा (सोलापूर) : कन्हैयालाल देवी यांनी विधानसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) सर्व उमेदवारांचे त्यांना नगराध्यक्षपदासाठी समर्थन राहील, असे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे आले होते. महायुतीकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त होती. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्याकडे असलेल्या इच्छुकांची संख्या जास्त होती. राष्ट्रवादीकडेही पूर्ण पॅनलची यादी होती. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता देवी यांना आमचे समर्थन आहे. एकत्रित लढण्याची आमची भूमिका होती. मात्र तडजोड झाली नाही. देवी यांनी विधानसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. आम्हाला महायुती धर्म पाळायचा आहे. वरिष्ठ पातळीवरून स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, अशा सूचना होत्या. त्यानुसार हा निर्णय घेतला, से शिंदे यांनी सांगितले आहे.
जागा वाटपासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे व पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. भाजप हा मोठा पक्ष आहे, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. करमाळ्याचे राजकारण हे कसं आहे सर्व पहात आहेत. आम्ही करमाळ्यात सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी प्रचार करत आहोत, असेही ते म्हणाले.
