करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये माजी प्राचार्य वाणिज्य विभागप्रमुख डॉ. विजयराव बिले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी विजयश्री सभागृहात व्याख्यानही झाले. पुणे येथील निलया अकॅडमीचे प्रा. केतन गोडबोले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. त्यांनी ‘वाणिज्य शाखा उत्तीर्ण झाल्यानंतर कशाप्रकारे करिअर करावे’ याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एल. बी. पाटील होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. बिले म्हणाले, महाविद्यालयात शिकत असताना लगेच मला याच महाविद्यालयात शिकवण्याची संधी मिळाली आणि माझे करिअर झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंकुश करपे यांनी केले. उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे व कॅ. संभाजी किर्दाक यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपाडे यांनी केले.