इंदापूर (पुणे) : नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून राज्यातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मुलींना मोफत उच्च शिक्षणसंदर्भत सरकारने निर्णय घेतला आहे.
याची जनजागृती विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक महाविद्यालयात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात याची मुलींना माहिती देण्यात आली.
या निर्णयाची महाविद्यालयात अंमलबजावणी करण्याकरिता महाविद्यालयातील प्रा. सचिन सावंत यांची नोडल ऑफिसर (शिष्यवृत्ती विभाग) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. सावंत म्हणाले, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC), इतर मागास प्रवर्गातील (OBC) मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के ऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क संदर्भातील सरकार निर्णय आहे. या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस, सरकारच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यापैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नुतनीकरण केलेल्या) मुलींना, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभा ऐवजी १०० टक्के लाभ देण्यास येणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले यासाठी येणाऱ्या ९०६ कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. विद्यार्थीना या सरकार निर्णयाचा फ़ायदा होणार आहे. त्यांनी १०० टक्के महाविद्यालयात हजर राहून तसेच अभ्यास करून हा सरकार निर्णय योग्य आहे हे सिद्ध करावे, असे आवाहन केले. महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींना पढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील २३४ विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.