करमाळा (सोलापूर) : ‘आईला माझ्या चुगल्या का सांगतो? म्हणत मुलाकडून मित्राच्या वडिलांना बॅटने मारहाण झाल्याचा प्रकार केत्तूर नंबर २ येथे घडला आहे. यामध्ये एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विजय हनुमंत कनीचे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सूर्यकांत बाबासाहेब सुमंत (वय ४२) यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. १२ तारखेला रात्री हा प्रकार घडला आहे.
सुमंत यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘१२ तारखेला रात्री मुलगा ओंकार हा जेवण करून घरातून बाहेर गेला होता. त्याच्या आईने त्याला फोन केला तेव्हा त्याचा फोन लागत नव्हता म्हणून फिर्यादी वडील त्याला पहाण्यासाठी बाहेर गेले. तेव्हा गणेश खोटे यांच्या खताच्या दुकानामागे मोठ्याने बोलण्याचा आवाज आला. दरम्यान तेथे ओंकारसह गुन्हा दाखल झालेला विजय व बंटी साळवे हे मित्र बसलेले होते. तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले होते.’
दरम्यान ‘मुलगा ओंकारला ओरडून घरी घेऊन जात असताना मित्र विजयने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यांनतर ओंकारला घरी सोडवून विजयच्या घरी हा प्रकार त्याच्या आईला सांगत होतो. तेव्हा चिडलेला विजय हातात बॅट घेऊन आला व माझ्या चुगल्या का सांगतो असे म्हणत डोक्यात मारहाण केली.’ त्यांच्यावर करमाळ्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.