करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ काल (शुक्रवारी) शरद पवार यांची सभा झाली. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत माजी आमदार नारायण पाटील यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पवार यांनी कारखान्यावरून बागल गटाला टार्गेट केले. मात्र आमदार शिंदे यांच्यावर त्यांनी एक शब्दही न काढल्याने त्यांना पवार यांच्याकडून सॉफ्ट कॉर्नर मिळाला असल्याची चर्चा आहे.
करमाळ्यातील सभेदरम्यान शरद पवार किंवा आमदार रोहित पवार हे करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर काही बोलतील का? अशी चर्चा होती. आमदार शिंदे हे सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेते मानतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात उमेदवार होते. दोन्ही पवारांनी आमदार शिंदे यांच्याबद्दल एकशब्दीही न काढल्याने त्यांना सॉफ्ट कॉर्नर दिला असल्याचे बोलले जात आहे.
आमदार रोहित पवार यांनी कारखान्यावरून बागल गटाला टार्गेट केले. आमदार पवार म्हणाले, सोलापुरचे पहिले पालकमंत्री म्हणून शरद पवार यांनी काम पाहिले होते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांना त्यांनी मदत केली. शेतीच्या संबंधीत त्यांचे मोठे काम केले आहे. स्व. गोविंदबापूनी आदिनाथ कारखान्यासाठी मोठे योगदान दिले आहे. मात्र मध्यंतरी माजी आमदार नारायण पाटील आबा हे चुकीच्या लोकांच्या नादी लागले. हे नादी लागताना त्यांचा दृष्टीकोन चुकीचा नव्हता. मंत्री सावंत यांनी त्यांना यात उतरवले. आणि स्वतःचा कारखाना व्यवस्थित चालावा म्हणून त्यांनी आदिनाथ बंद पाडला. मंत्री तानाजी सावंत यांनीच आदिनाथ कारखान्याचे खरे नुकसान केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र आम्ही आदिनाथ कारखान्याचे कधीही नुकसान होऊ देणार नाही, असे म्हणतानाच ‘मकाई’ कारखान्याचीही बागल यांनी काय अवस्था केली आहे, असे म्हणत माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यावर पवार यांनी टीका केली आहे. ‘मकाई’ कारखान्याकडे शेतकऱ्यांचे पैसे थकले आहेत, ते पैसे कधी मिळणार असा प्रश्न त्यांनी केला आहे. येणाऱ्या काळात करमाळा तालुक्यातील सर्व ऊस आम्ही गाळप करू. भविष्यात आपल्याच विचाराचा माणुस आमदार होणार आहे’, असेही त्यांनी सूचक विधान केले आहे.