करमाळा (सोलापूर) : रिटेवाडी उपसा सिंचन योजनाच्या सर्व्हेसाठी आठ दिवसात निधी उपलब्ध होणार आहे, असे मकाई सहकारी साखर कारखान्याची माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी सांगितले आहे.
करमाळा तालुक्यातील ४० गावांतील शेतकऱ्यांसाठी प्रस्तावित असलेली रिटेवाडी उपसा सिंचन योजना महत्वाची समजली जात आहे. बागल गटाची नेत्या रश्मी बागल यांनी भाजप प्रवेश करतेवेळी ‘रिटेवाडी उपसा सिंचन योजना’ मंजूर करावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधीक्षक अभियंता यांना निधी उपलब्ध करून देणेविषयी अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत, असे बागल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले यह.
बागल म्हणाले, पुढील आठवड्यात या योजनेच्या सर्व्हेसाठी जवळपास ४५ लाख निधीची तरतूद होणार आहे. भाजप प्रदेशउपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या पाठपुराव्याला यश मिळत असून तालुक्यातील पांढरेवाडी व केम- वडशिवने उपसा सिंचन योजनेसाठीही सरकारकडे पाठपूरावा सुरू आहे. रीटेवाडी उपसा सिंचन योजना तात्काळ पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येऊन आमचा हा भाग सुजलाम् सुफलाम् होणेविषयी आम्ही सातत्याने प्रयत्न राहीन, असेही बागल यांनी सांगितले आहे.