करमाळा (सोलापूर) : वीट जिल्हा परिषद गटातून अश्विनी चिवटे यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला. या विजयानंतर त्यांचे पती भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांची दिवेगव्हाण येथे चक्क हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ईश्वर मोरे यांच्या पुढाकारातून ही मिरवणुक काढण्यात आली. हलगी, बॅन्जोच्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात काढलेल्या मिरवणुकीची करमाळा तालुक्यात चर्चा रंगली आहे.
मिरवणुकीनंतर येथे विजयी सभा घेण्यात आली. अभिषेक मोरे, निलचंद दुरंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, भगवान गिरी गोसावी यांनी मनोगत व्यक्त करून चिवटे यांच्या नेतृत्वगुणांचे व विकासाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले. चिवटे म्हणाले, ‘तालुक्यात विक्रमी मताधिक्याने विजय मिळाल्यानंतर मोरे यांनी प्रेमापोटी काढलेली ही मिरवणूक माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी वीट जिल्हा परिषद गटासह दिवेगव्हाण व तालुक्यातील इतर गावांच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे.’ ‘मी वीट जिल्हा परिषद गटातून विजयी झालो असलो तरी संपूर्ण तालुक्यात विकासकामे करण्याचा प्रयत्न राहील’, असेही त्यांनी सांगितले.
‘चिवटे यांचा विजय हा केवळ निवडणुकीचा निकाल नाही तर विकास कामाचा विश्वास आहे. त्यांनी केलेल्या कामांची जाणीव ठेवूनच आम्ही त्यांचा सन्मान हत्तीवरून मिरवणूक काढून केला. हे आमच्या प्रेमाचे आणि ठाम पाठिंब्याचे प्रतीक आहे,’ असे मोरे यांनी सांगितले.
