करमाळा (सोलापूर) : ‘करमाळा तालुक्यातील महत्वाची म्हणून समजली जाणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मला आमदार म्हणून निवडून द्या’, असे आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केले आहे. वीट येथे अपक्ष उमेदवार झोळ यांच्या प्रचारार्थ सभा झाली. शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, हरीभाऊ मंगवडे, गफुर शेख, सुभाष शिंदे, रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, सुदर्शन शेळके, भगवान डोंबाळे, प्रशांत बागल, सुहास काळे, भीमराव ननवरे, चंद्रशेखर जगताप, संभाजी शिंदे आदी उपस्थित होते.
प्रा. झोळ म्हणाले, रिटेवाडी उपसासिंचन योजना मार्गी लागल्यास वीट, रावगाव, मांगी, जातेगांव भागातील गावांना फायदा होणार आहे. वीट, वंजारवाडी, पिंपळवाडीबरोबर पंचक्रोशीतील गावांमध्ये पिण्याचे पाणी सुद्धा देऊ शकले नाहीत. येथे दुष्काळामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा आम्ही केला आहे. रस्ते केंद्र व राज्य सरकारने केले आहेत. यात लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय केलं? वीट-उमरड रस्ता आणखी तसाच आहे. पाण्याचा प्रश्न तसाच आहे. रिटेवाडी योजनेसाठी स्व. शहाजी माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते. करमाळा तालुक्यात आधुनिक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, उद्योग, रोजगार निर्मितीसाठी, सर्वांगीण विकासासाठी, एक वेळ आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन प्रा. झोळ यांनी केले आहे.
कांबळे म्हणाले, चार उमेदवारांमध्ये प्रा. रामदास झोळ हे उच्चशिक्षित नेतृत्व आहे. गटातटाच्या नेत्यांना बाजूला सारून त्यांना एक वेळ आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या. गेल्या निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? याचे जाब विचारला पाहिजेत. रेडिमेड गांरमेंट, सूतगिरणी सुरू झाली का? रोडकिंग, पाणीदार असणारे रोड कुठे झाले? पाण्याचा प्रश्न का सुटला नाही? आदिनाथ, मकाई बंद असल्यामुळे शेतकरी, कामगार यांची अवस्था बिकट का झाली? याचा विचार गांभीर्याने करून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार निर्मितीसाठी प्रा. झोळ यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रास्ताविक श्रीकांत साखरे यांनी केले. तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी मानले.