करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. मात्र भाजपने निंबाळकरांना तिकीट दिल्याने मोहिते पाटील समर्थक नाराज आहेत. ते सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी जातील, अशी शक्यता आहे. त्यातच करमाळ्यात महायुतीमधील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज (बुधवार) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेऊन कानमंत्र दिला. दरम्यान त्यांनी करमाळ्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.
पालकमंत्री पाटील हे आज करमाळा दौऱ्यावर आले होते. त्यांनी माजी आमदार शामलताई बागल यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर आमदार संजयमामा शिंदे यांच्या ‘विठ्ठल निवास’ या संपर्क कार्यालयात जाऊन आमदार शिंदे यांची भेट घेतली. तेथील भेटीनंतर ते माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या ‘सटवाई फार्महाऊस’ येथे गेले. तेथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेथून शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या भेटीला गेले. तेथून मेन रोड येथील कन्हैयालाल देवी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तेथील भेटीनंतर विकी मंगल कार्यालय येथे त्यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपसह, आरपीआय, रयत क्रांती, राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांच्या पदाधिकाऱ्यांशी सवांद साधला. त्यानंतर त्यांनी जेऊर येथे जाऊन मोहिते पाटील समर्थक माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली असल्याचे समजत आहे.
करमाळ्यात पदाधिकारी संवादावेळी आमदार जयवंतराव जगताप, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे, आदिनाथचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी केले. आमदार शिंदे, बागल, चिवटे, साळुंखे, अजय बागल, श्री. गाडे, जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले.