करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात साधारण २० टक्के महिलांच्यात खात्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. आणखी पैसे जमा होत असून आधार लिंकसाठी अडचण येऊ नये म्हणून आपण शिबिरे घेत आहोत, अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत करमाळा तालुका अव्वल! आमदार शिंदेकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही सरकारची महत्वकांशी योजना आहे. योजना जाहीर केल्यापासून महिलांना अर्ज दाखल करता यावेत म्हणून सरकारने विविध उपाय योजना केला. त्यानुसार महिलांनी अर्ज दाखलही केले. त्याची छानणी करून लाभ देण्याची प्रक्रिया करण्यात आली. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट योजनेमुळे करमाळा तालुक्यात सर्वाधिक अर्ज मंजूर झाले होते. यामध्ये अंगणवाडी सेविका व संगणक ऑफरेटर यांची भूमिका महत्वाची ठरली होती. आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यलयांकडूनही मदत कक्ष सुरु करण्यात आला होता.
गावपातळीवर मेळावे घेणे, बैठका घेणे, ऑनलाइन केंद्र सुरु करून अर्ज भरायला मदत करणे, मोफत ऑफलाईन अर्जांचे वितरण करणे, तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये या कामासाठी मदत कक्ष सुरू करणे आदी कामे करण्यात आली होती. त्यामुळेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत महाराष्ट्रामध्ये करमाळा तालुका अव्वल ठरला होता. करमाळा तालुक्यात ३४ हजार ३६२ अर्जापैकी ३० हजार ९९६ अर्ज मंजूर झाले होते. मंजूर झालेल्या लाभार्थींना रक्षाबंधननिमित्त पहिल्या २ महिन्यांचे पैसे येणे सुरु झाले आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असल्याने पुन्हा यामध्ये ११०० अर्ज आलेले आहेत. लाभार्थींसाठी कोणतीही अडचण येणार नाही याचे नियोजन केले असल्याची माहिती तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले आहे. याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिलांशी संवादही साधला आहे.