तरटगाव बंधाऱ्यावरील शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! सीना नदीच्या महापुरात वाहून गेलेल्या भरावाचे काम होणार तत्काळ पूर्ण

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्याच्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. महापुरात वाहून गेलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने यावर्षी पाणी अडवले जाणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली होती. एवढे पाणी येऊनही बंधाऱ्यात पाणी राहिले नसते तर प्रचंड मोठे नुकसान होणार होते. मात्र पाटबंधारे विभागाने हे काम जलदगतीने हाती घेतले आहे. त्यामुळे या बंधाऱ्या नेहमी प्रमाणे पाणी राहणार आहे. कामही सुरु झाले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सीना नदीवर करमाळा तालुक्यात संगोबा, पोटेगाव, तरटगाव व खडकी येथे पाटबंधारे विभागाचे कोल्हापूर पद्धतीचे लघु बंधारे आहेत. खडकी बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती नगर जिल्ह्यात आहे. पोटेगाव बंधारा नादुरुस्त आहे. तर तरटगाव बंधाऱ्याचा दुसऱ्या महापुरात भराव वाहून गेला होता. तिसऱ्या महापुरात तर प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे हा बंधारा दुरुस्त होईल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना होती.

पहिला महापूर आला तेव्हा येथे पालकमंत्री जयकुमार गोरे व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली होती. त्यानंतर बिटरगाव (श्री) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे आले होते. याबरोबर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जयंत पाटील, आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार शिल्पा ठोकडे व पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी येथे भेटी दिल्या होत्या. शेतकऱ्यांनी हा बंधारा त्वरित दुरुस्त करण्याची त्यांच्याकडे मागणी केली होती. या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी अतितातडीचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून हे काम केले जात असल्याचे शाखाधिकारी अरुण कांबळे यांनी सांगितले.

कांबळे म्हणाले, ‘या बंधाऱ्यात पाणी अडवणे याला आमचे प्राधान्य आहे. हा बंधारा दुरुस्त झाल्यानंतर बिटरगाव श्री, तरटगाव, आळजापूर, जवळा, खडकी या गावातील शेतीला फायदा होणार आहे. पूर्ण क्षमतेने बंधारा अडवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. करमाळा उपविभागाचे अभियंता प्रकाश बाबा, तहसीलदार ठोकडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे यामध्ये मोठे सहकार्य आहे. येथे रस्ता होणे आवश्यक आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. बंधाऱ्याचा भराव भरण्याचे काम सुरु आहे. टप्याटप्यात सर्व काम केले जाणार आहे. काही ठिकाणी जलसंधारणची मदत घेतली जाणार आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *