करमाळा (सोलापूर) : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी संबंधित असलेल्या विहाळ येथील साखर कारखान्याला विहाळ ग्रामपंचायतीने कर थकवल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. या कारखान्याकडे 12 लाख 76 हजार 384 रुपये थकले आहेत. विहाळ येथे मंत्री सावंत यांनी कारखाना सुरु केल्यापासून कर चुकवला असल्याचा आरोप सरपंच पूजा मारकड यांनी केला आहे. याबाबत कारखाना प्रशासनाचे काय म्हणणे येते हे पहावे लागणार आहे.
सरपंच मारकड यांनी म्हटले आहे की, ‘2011 पासून मंत्री सावंत यांच्या विहाळ येथील भैरवनाथ शुगर या कारखान्याने ग्रामपंचायतीला रीतसर कर भरला नाही. हा कारखाना विहाळ ग्रामपंचायत हद्दीत येतो. या कारखान्याची 2023 पर्यंत ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद नव्हती. यावर्षी कारखान्याची नोंद ग्रामपंचायतला करण्यात आली आहे. कारखाना प्रशासनाकडून ग्रामपंचायत दप्तरी नोंद न लावण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र संपूर्ण कारखाना व कारखान्याची संबंधित असलेले इतर बांधकाम याच्या नोंदी ग्रामपंचायतला लावण्यात आले आहेत.
पुढे बोलताना सरपंच मारकड म्हणाल्या, ‘कारखान्याने ग्रामपंचायतीला कर भरणे बंधनकारक असतानाही जाणीवपूर्वक कारखान्याने कर भरण्यास टाळाटाळ केली आहे. ग्रामपंचायतचा लाखो रुपयांचा कर थकला आहे. गावच्या विकास कामाला यातून हातभार लागणार आहे. ग्रामपंचायतीने यावर्षाचा कर आकारणीसाठी 12 लाख 76 हजार 384 एवढी रक्कम भरण्याची नोटीस कारखान्याला दिली आहे. कारखान्याने योग्य पद्धतीने वेळीच कर भरला नाही तर याबाबत ग्रामपंचायत न्यायालय जाण्याच्या भूमिकेत आहे’, असेही त्या म्हणाल्या आहेत.
‘कारखान्याला रीतसर कर भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे, ही नोटीस बजावल्यानंतर कारखाना प्रशासनाकडून ग्रामपंचायतीने कर मागितला तर आम्ही विहाळ गावातील कारखान्यावर काम करणाऱ्या कामगारांना काढून टाकू, अशा स्वरूपाचे निरोप पाठवले जात आहेत. कर भरणे आणि गावातील कामगारांना कामावर काढून टाकण्याचा संबंध लावून कारखाना ग्रामपंचायतचे मोठे नुकसान करत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कर वेळी भरला नाही तर कायदेशीर रित्या कारखान्यावरती कारवाई करण्यात येईल. कारखाना स्थापन झाल्यापासून सर्व कर कारखान्याने भरणे बंधनकारक आहे. कारखान्याने थकवलेला सर्व कर व्याजासह वसूल करण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा यांना कायदेशीर मार्गदर्शन मागवले आहे.’ असेही मारकड म्हणाल्या आहेत.
ठळक मुद्दे
- २०११ पासून विहाळ येथे कारखाना सुरु झाला
- मंत्री तानाजी सावंत हे संस्थापक अध्यक्ष असलेला हा कारखाना
- कारखाना स्थळावर जाऊन ग्रामपंचायतीने केली मोजणी
- जूनमध्ये ग्रामपंचायतीचे कारखान्याला पत्र
- कर आकारणीचा प्रयत्न झाल्यानंतर कामगारांना धमकी होत असल्याचा आरोप
- लाखो रुपयाचा कर चुकवल्याने ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान