करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातून जात असलेल्या नगर ते टेंभुर्णी या महामार्गाची खड्ड्याने अक्षरशः चाळण झाली आहे. जातेगाव ते टेंभुर्णी अशी सोलापूर जिल्ह्यात या मार्गाची हद्द आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जात आहे. खड्ड्यामुळे सतत अपघात होत आहेत. यातूनच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी गांधीगिरी करत जातेगाव ते करमाळ्यापर्यंतचे स्वखर्चाने खड्डे बुजवले आहेत.
प्रशासन याकडे गांभीर्याने पहाणार आहे की अजूनही डोळेझाकच करणार आहे हा प्रश्न सर्वसामान्य नागरीकातून केला जाऊ लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मांगी येथील पुलाचे सुरक्षारक्षक खांब व अँगल लोंबकळत आहेत. येथे अपघाताची शक्यता आहे. या पुलावर अनेकदा लहान मोठे अपघात झाले आहेत. त्यात जीवितहानीही झालेली आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने वाहन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. आज (रविवारी) वाहतूक पोलिसांनाही कसरत करावी लागली.
खासदारसाहेब याकडे लक्ष द्या
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने खड्ड्याचे प्रमाण वाढले आहे. जातेगाव, वडगाव, मांगी, कामोणे, पुनवर आदी ठिकाणच्या नागरिकांच्या या मार्गावरून रहदारी असते. सरकारकडे पाठपुरावा करून आम्ही आता थकलो आहोत. येथे सतत अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी आम्ही खड्डे बुजवले आहेत. यात सुधारणा झाली नाही तर आम्ही लोकांना घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत. हा रस्ता महत्वाचा आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी वारे यांनी केली आहे. या मार्गावर खड्डे असल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तालुक्यातील नागरिकांची मात्र गैरसोय होत आहे, असे वारे म्हणाले आहेत.