करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी करमाळ्यात सकल मराठा समाज बांधवांनी करमाळा बंदची हाक दिली आहे. त्याला करमाळ्यातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाज बांधवानी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. या बंदमध्ये करमाळा शहर व तालुक्याने सहभाग घेतला आहे.
बुधवारी (ता. 14) सकाळपासूनच गजबजणारा करमाळा येथील मेन रोड, सुभाष चौक, पोथरे नाका येथे बंदचा परिणाम दिसला. येथील मेडिकल सोडून सर्व दुकाने बंद आहेत. जुनी भाजी मंडई येथील भाजीची काही दुकाने सुरु आहेत. तेथीलही अनेक दुकाने बंद आहेत. समाज बांधवांच्या वतीने बुधवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय येथे निवेदनही दिले जाणार आहे, अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.