करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात समाज माध्यमांवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मॅसेज केल्याचा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी खबरदारी घेऊन भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यावर कारवाई करत अटक केली. यामध्ये ग्रुप ऍडमीनवरही गुन्हा दाखल झाला असून करमाळा पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती सर्वत्र पोहचताच अनेक ग्रुपवर ‘ओन्ली ऍडमीन’ सेंटिंग करण्यात आली असून याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
करमाळा शहर व तालुका हे तसे शांत आहे. येथे सर्व धर्माचे व सर्व पक्षाचे कार्यकर्ते अनेक कार्यक्रमाच्या किंवा सुखदुःखात सहभागी झालेचे दिसतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या प्रकारामुळे वातावरण दूषित होऊ लागले आहे. याचा परिणाम करमाळा शहर व तालुक्यावर होऊ नये म्हणून पोलिसांसह सर्वांची जबाबदारी आहे. बाहेर घडलेल्या घटनेचा एखादा व्हिडीओ भावना दुखावेल असा शेअर करणे टाळणे आवश्यक आहे. यावर आता पोलिसांचीही नजर आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस यंत्रणा सतर्क आहे. यातूनच काल झालेला प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ ऍक्शन घेतली आहे. याचे पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करत चुकीची पोस्ट शेअर न करण्याचे आवाहन केले. याची धास्ती घेत अनेकांनी फटाफट ग्रुपच्या सेटिंग बदलल्या.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार कायदा सुव्यवस्था बिगडू नये म्हणून सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. शहनिशा आणि त्यामुळे कोणाची भावना दुखावेल असे मेसेज फॉरवर्ड करू नयेत. एखादा मॅसेज फॉरवर्ड झाला तरी ऍडमिनने तो डिलीट करणे आवश्यक आहे. तो अधिकार ऍडमिन आणि शेअर करणारालाच आहे. त्यामुळे दोघांवरही गुन्हा दाखल होतो. यातूनच करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत.