इंदापूर : महिला दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकमध्ये महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये ‘महिला सक्षमीकरणावर’ विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका अनुसया सूर्यवंशी उपस्थित होत्या. स्कूल ऑफ आर्किटेक्चर, विद्या प्रतिष्ठान, बारामती यथील प्राचार्या डॉ. राजश्री पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सूर्यवंशी यांनी उद्योजकीय प्रवासातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
सूर्यवंशी म्हणाल्या, ‘विद्यार्थिनींना परिश्रम, जिद्द व सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते’. महिला सन्मान दिनाच्या निमित्ताने त्यांनी महिलांच्या सन्मान, समानता आणि सक्षमीकरणाचा संदेश दिला. विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच उद्योजकतेकडेही लक्ष द्यावे, नवीन कल्पना विकसित कराव्यात आणि रोजगार निर्माण करणाऱ्या बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. पाटील यांनी उद्योजकता व व्यवसाय क्षेत्रातील महिलांच्या संधी आणि आव्हाने यावर मार्गदर्शन केले. उद्योजकतेकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आवाहन त्यांनी केले. फक्त नोकरीच्या संधी शोधण्यापेक्षा नवीन कल्पना, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वतःचा व्यवसाय उभारण्याची मानसिकता विकसित करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थिनींनी आपल्या कौशल्यांचा विकास करून आत्मनिर्भर बनावे, असा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी इतिहासातील महान स्त्री व्यक्तिमत्त्वांवर आधारित भूमिका सादरीकरण (Role Play) सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
त्यामध्ये श्रद्धा गलांडे – जिजाऊ, मनीषा ओव्हाळ – सावित्रीबाई फुले, मानसी चौधरी – महाराणी येसूबाई, सृष्टी जगताप – महाराणी ताराबाई, अदिती शिंदे – सरोजिनी नायडू यांनी प्रभावी सादरीकरण केले. तसेच अश्विनी बनसोडे आणि श्रावणी मखरे यांनी सामाजिक संदेश देणारे नाट्य सादरीकरण करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. प्रा. प्रियांका सूर्यवंशी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या महिला तक्रार व निवारण समिती अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन भारती नलवडे यांनी केले. हा कार्यक्रम महिला तक्रार व निवारण समितीच्या अध्यक्षा प्रा. विदुलता जाधव, प्रा. सचिन पवार आणि प्रा. संतोष देवकाते यांच्या नियोजनातून यशस्वीपणे पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा आणि समाजातील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
