करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या कोर्टी गटासाठी बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे यांनी तर भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांच्या उपस्थितीत वीट गटासाठी अश्विनी चिवटे, हिसरे गणासाठी भारत अवताडे यांच्यासह आज (मंगळवार) शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. टाकळीसह कोर्टी गटातील प्रत्येक गावातून शेकडो गाड्यांच्या माध्यमातून कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी करमाळ्यात आले होते. राष्ट्रवादीचे झेंडे यावेळी लक्षवेधत होते. यावेळी हिसरे गणासाठी भारत अवताडे, कोर्टी गणासाठी ऍड. अजित विघ्ने, शिंदे व बागल गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोर्टी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. बारामती ऍग्रोच्या माध्यमातून गुळवे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे या भागातून आश्वासक चेहरा म्हणून पाहिले जात आहे. करमाळा तालुक्यात माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा शिंदे गट व भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांचा बागल गट एकत्रपणे ही निवडणूक लढणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून ही युती झाली आहे.
गुळवे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी कोर्टी भागातील प्रत्येक गावातून कार्यकर्ते करमाळ्यात आले होते. टाकळी येथून एकामागे एक अशा शेकडो गाड्यांच्या ताफ्यात गुळवे करमाळ्यात दाखल झाले. श्री देवीचामाळ येथे आल्यानंतर हालगीच्या कडकडात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे व गुळवे यांनी श्री कमलाभवानी देवीचे दर्शन घेतले. कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून देवीच्या मंदिरापर्यंत आणले. दर्शन घेतल्यानंतर ऍड. नितिनराजे भोसले यांच्या हस्ते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडण्यात आले. त्यानंतर वाजत- गाजत कार्यकर्तेच्या उपस्थितीत तहसील कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
गणामध्ये दाखल झालेले अर्ज
उमरड : सुनीता मारकड. केम : महावीर तळेकर, उद्धव भोसले, साधना पवार. साडे गण : बाजीराव माने, शशिकांत शेलार, दशरथ घाडगे. हिसरे गण : कृती लावंड, भारत अवताडे, आकाश अवताडे, नवनाथ जगदाळे, हनुमंत नीळ, समाधान फरतडे. रावगाव : दीपा कांबळे. पांडे : जितेश कांबळे. वांगी : सोनाली तकिक, गायत्री शेळके, शर्मिली रोकडे. केत्तूर : संतोष वारगड, सुहास मिसळ, विठ्ठल मोरे, ऍड. अजित विघ्ने, उदयसिंह मोरे पाटील, शाहजी पाटील, ऍड. बाळासाहेब जरांडे, ऍड. नितीन राजेभोसले, विलास कोकणे, किरणकुमार निंबाळकर, अमोल जरांडे. कोर्टी : संभाजी शिंदे, संजयकुमार जाधव, सतीश शेळके, नानासाहेब आढाव, ऍड. सुमित गिरंजे, अमोल गिरंजे, मोहंमद शेख, नाना झाकणे, नवनाथ दुरंदे, रेवनाथ साखरे. चिखलठाण, जेऊर व वीट गणासाठी आज एकही अर्ज आलेला नाही.
गटासाठी आलेले अर्ज
केम : मालती देवकर, साधना पवार, कल्याणी तळेकर. चिखलठाण : विकास गलांडे. वीट : अश्विनी चिवटे. पांडे : राणी वारे व ज्योती सावंत. कोर्टी : सवितादेवी राजेभोसले, वनिता गुळवे, योगिनी राजेभोसले व राजलक्ष्मी मोरे पाटील.
