करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे बारावीची परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रवेशद्वारापासून परीक्षा हॉलपर्यंत दोन्ही बाजूने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर गटशिक्षण अधिकारी पाटील, प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेची आजपासून (बुधवार) सुरुवात झाली आहे. करमाळा शहरात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय व कन्या प्रशाला येथे विद्यार्थी परीक्षा देत आहेत, अशी माहिती केंद्र प्रमुख उपप्राचार्य संभाजी कीर्दक यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे म्हणून दरवर्षीप्रमाणे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. राख, प्रा. भोंग आदी यावेळी उपस्थित होते.