करमाळा (सोलापूर) : ‘आनंद हा दूर दूरवर कोठे नसून तो घरामध्येच असतो. आपण तो शोधत नाही. त्यामुळे आनंदाऐवजी दुःख आपल्या पदरात पडते. खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर ज्ञान, विचार आणि वाचन यांची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक घरामध्ये पुस्तके असली पाहिजेत,’ असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले.
सर्वोदय प्रतिष्ठान आयोजित करमाळा येथील बौद्धिक व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे होते. कळमकर म्हणाले, ‘आपल्याकडे सुखाची साधने आहेत पण समाधान नाही. मोठी गादी आहे पण झोप नाही, पंचपकवानाचे ताट आहे पण भूक नाही. हाती पुष्कळ साधने असूनही त्याचा उपभोग घेता येत नाही, दुसऱ्याचा हव्यास करणे आपल्या जवळचं न आवडणे यामुळे दुःख निर्माण होते. मोबाईलच्या आहारी गेलेल्या जीवनात परिवाराशी संवाद संपत चालला आहे. खरा आनंद आपल्या कुटुंबातच आहे पण आपण तो गमावतोय. जुन्या संकल्पना समजून घेतल्या घरामध्ये संवाद वाढला तरच सुख, आनंद लाभू शकते’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘युवा पिढीने स्वतःच्या पायावर उभे रहावे’, असे आवाहन घुमरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित कणसे यांनी केले. शरद पायघन, वैभव पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. विष्णु शिंदे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे, यशकल्याणीचे संस्थापक प्रा. गणेश करे पाटील, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड सर, सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण, सचिव अमर साळुंखे, यांच्यासह ॲड. बाबुराव हिरडे, ॲड. दत्तात्रय सोनवणे, सचिन पिसाळ, कवी खलील शेख, साहित्यिक भीष्माचार्य चांदणे, बाळकृष्ण लावंड, कल्याणराव साळुंखे, डॉ. आप्पासाहेब लांडगे, दिगंबरराव साळुंखे, पत्रकार गजेंद्र पोळ, उद्योजक वैभव पोळ, सचिन पिसाळ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद कुलकर्णी, शिवलाल शिंदे, सुधीर माने, संतोष कांबळे, गोपाल वाघमारे, जयेश पवार आदींनी परिश्रम घेतले.