करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात आज (रविवारी) सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून अनेक ठिकाणी शेतातील ताली भरल्या आहेत. काही ठिकाणी ओढ्यांनाही पाणी आले आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच पावसाने मात्र रस्त्यांची वाट लागली आहे.
करमाळा तालुक्यात गुरुवारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर शुक्रवारीही कमी- अधिक प्रमाणात पाऊस झाला. शनिवारी रात्री आणि आजही दुपारी पाऊस झाला आहे. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीही सुरु केली आहे. आता वापसा झाल्यानंतर पुन्हा सर्वत्र पेरणी होईल, अशी शक्यता आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाने शेतातील ताली पाण्याने भरल्या आहेत. काही ठिकाणी तर ओढ्यांनाही पाणी आले आहे.
या पावसामुळे रस्त्यांची मात्र पूर्णतः वाट लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावरून पाण्याचा निचरा झालेला नसल्याने रस्ते उखडले आहेत. काही ठिकाणी तर उन्हाळा असतानाही रस्त्यांची डागडुजी झाली नव्हती. त्यामुळे नागरिकांना या पावसाळ्यात खड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. करमाळा- जामखेड रस्त्यावर गॅस गोडवान येथे रस्त्यावर पाण्याचा डोह झाला आहे. घाण ओढ्यावरही पाणी साचले आहे. कुकडे वस्तीजवळ, बागेतला बुवा येथील ओढ्यावर व कान्होळा नदीच्या पुलावरून पाण्याचा निचरा झालेला नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.