करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात आज (शनिवारी) पहाटेपासून अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक ओढ्याना पाणी येऊन दळणवळणावर परिणाम झाला आहे. कुंभेज तलाव भरला असून तेथील कुटुंब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केली आहेत. बोरगाव, निलज संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन काही कुटुंब संगोबा येथून एसटी बसने महामुनी मंगल कार्यालय येथे स्थलांतरित केली आहेत. तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलिस यांनी सर्व नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सीना नदीत आळजापूर येथून नांदणी नदीचे पाणी आले आहे. पोथरे येथील कान्होळा नदीचे पाणी सीना नदीत येत आहे. याशिवाय आष्टी, कडा आणि नगर जिल्ह्यातील पाणी सीनेत आल्यास आणखी धोका निर्माण होऊ शकतो. सध्य स्थितीत ओढ्याना आलेल्या पाण्यांमुळे जनजीवन अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
दहीगाव शेटफळ शिवारात झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने दोन्ही ठिकाणचे पूल वाहून गेले आहेत. लोखंडे वस्ती परिसरात राहणाऱ्या 200 पेक्षा जास्त लोकांचा दहीगाव- शेटफळ या दोन्ही बाजूकडून संपर्क तुटल्याने या परिसरातील लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करण्याची वेळ येत आहे. (ही सकाळची परस्थिती आहे. यामध्ये आता काही ठिकाणी सुधारणा झालेली आहे.)

दहीगाव येथील शेळके वस्तीवरून जाणारा एक रस्ता आहे तर शेटफळ गावापासून लबडेवस्ती कडून जाणारा एक रस्ता आहे. या दोन्ही रस्त्यावर मोठे ओढे असून गेल्यावर्षी लोकवर्गणीतून या परिसरातील लोकांनी या दोन्ही ठिकाणी स्वतः सिमेंट पाईप आणून पूल बनवले होते. परंतु या दोन्ही ठिकाणचे पूल झालेल्या पावसाने वाहून गेल्याने या परिसराचा काहीकाळ संपर्क तुटला होता. जेसीबीच्या मदतीने शेटफळवरून तात्पुरता रस्ता सुरु झाला आहे.
थोडक्यात…
- बोरगावमधील जवळपास 25 लोकं सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासन व स्थानिक नागरिक यशस्वी
- नगर- करमाळा रोड, छोरिया जवळच वाहतूक बंद
- केम- करमाळा रोडवरचा पांडवडा येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता सध्या स्थितीत बंद
- जेऊर- जिती रोड उमरड येथे बंद
- दहिगाव पूल वाहून गेला
- सीना नदीच्या पाण्यात वाढ होत आहे.



