करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आज (बुधवारी) तुरीला उच्चांकी दर मिळाला आहे. फिसरे येथील जिजाऊ महिला शेतकरी गटाला हा दर मिळाला आहे. 10 हजार 161 रुपये प्रति क्विंटलने आज तुरीला दर मिळाला आहे. कमीतकमी 8 हजार तर जास्तीतजास्त १० हजार १६१ पर्यंत तुरीला बाजार भाव मिळाला आहे. करमाळा बाजार समितीमध्ये तूर विकण्यासाठी आलेले इतर शेतकऱ्यांनी तुरीच्या गुणवत्तेचे कौतुक करून एवढ्या चांगल्या पद्धतीची तूर कशी आली हे विचारताच गटातील सदस्यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून हे सर्व शक्य झाले असल्याचे सांगितले. करमाळा टीमने उपस्थित शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून त्यांच्या गावामध्ये बैठकीचे नियोजन केले. करमाळा बाजार समितीचे सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप व सचिव विठ्ठल क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

