करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे. मात्र या निवडणुकीत कोणाची युती व कोणाची आघाडी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पडद्याआड अनेक घडामोडी सुरु असल्याचे समजत आहे. परंतु शेवटपर्यंत यामध्ये काय होईल हे सांगता येणार नाही.
करमाळा बाजार समितीत सध्या बागल गट सत्ताधारी आहे. तर जगताप गट विरोधात आहे. या निवडणुकीत काय होणार हे पहावे लागणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत जगताप, बागल, पाटील, शिंदे व सावंत गटाच्या भूमिका महत्वाच्या राहणार आहेत. सहकारी संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल तोलार अशा गटातून १८ संचालक येथे निवडून द्यायचे आहेत.
या निवडणुकीत जगताप गटाबरोबर कोण असेल हे पहावे लागणार आहे. सावंत गट सध्या ‘वेट अँड वॊच’च्या भूमिकेत आहे. पाटील गट आणि बागल गट यांच्या भूमिका महत्वाच्या असणार आहेत. जगताप आणि शिंदे हे सध्या एकत्र आहेत. मात्र बाजार समितीत त्यांच्या भूमिका महत्वाच्या राहणार आहेत. भाजपचे गणेश चिवटे यांनी योग्यवेळी निर्णय घेऊ, असे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना स्पष्ट केले आहे. तर भाजपचे दीपक चव्हाण यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.
तालुक्यात पक्षापेक्षा गटाचे राजकारण जास्त चालते. असे असले तरी राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतरची करमाळा तालुक्यातील ही पहिलीच निवडणूक आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचा सुद्धा निर्णय महत्वाचा राहू शकतो. राज्यातील राजकारणाची करमाळ्याशी तुलना केली तर शिंदे, पाटील, जगताप आणि बागल यांची सत्ताधारी पक्षाशी जवळीक आहे. मात्र स्थानिक राजकारणात त्यांची मते वेगळी आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाचा याच्याशी सबंध जोडणे कठीण आहे. सध्या कोण- कोण अर्ज दाखल करणार आणि शेवटी निवडणूक कशी होणार हे पहावे लागणार आहे. सावंत गटाचे सुनील सावंत हे सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजत आहे.