करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा अडचणीत आहे. हा कारखाना सुरु करण्यासाठी मी आमदारकीचा त्यागही करायला तयार असून वेळ पडल्यास कोणत्याही पक्षात जाईल. मला स्व. गोविंदबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा कारखाना घेईचा आहे,’ असे आमदार नारायण पाटील यांनी सांगितले आहे.
श्री आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलचा प्रचार शुभारंभ आज (सोमवारी) झाला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, सावंत गटाचे सुनील सावंत, जयप्रकाश बिले उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘आतापर्यंत आदिनाथ कारखाना ज्यांच्याकडे गेला त्यांनी कारखान्याचे हीत पाहिले नाही. माजी आमदार जगताप यांनी मात्र सर्वाधिक दर देत शेतकरी हीत पहिले होते. आता हा कारखाना उर्जित अवस्थेत आणल्याशिवाय मी राहणार नाही त्यासाठी मला आमदारकीचा त्याग करावा लागला तरी चालेल. या कारखान्यात माझे वडील गोविंदबापू यांनी प्रचंड त्याग केला आहे.’
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘हा कारखाना चांगल्या व्यक्तीच्या हातात राहिला असता तर नुकसान झाले नसते. आदिनाथ सहकारी साखर कारखाना मला बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेईचा आहे. या कारखान्याचे बांगर सुद्धा विकले आहे. कमलाई कारखाना चालत होता तेव्हा बीड व गेवराई भागातला ऊस आणला पण करमाळा तालुक्यातील ऊस गाळप केला नाही,’ असा टोलाही त्यांनी माजी आमदार शिंदे यांना लगावला आहे. पुढे ते म्हणाले, ‘कारखाना सुरु करण्यासाठी मी कोणत्याही पक्षात जाईल. माझ्या मागे मोहिते पाटील आहेत. शरद पवार यांचा शब्द कोणही मोडत नाही.’ सुभाष गुळवे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.