करमाळा (सोलापूर) : न्यायालयाची स्थगिती असताना भवानी नाका परिसरात बेकायदेशीर टपऱ्या टाकण्याचे काम सुरू आहे. याबाबत करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
करमाळा शहरातील भवानी नाका परिसरात श्री देवीचामाळ रोडवर अतिक्रमण करून टाकलेल्या टपऱ्या ‘जैसे थे ठेवा’ असा न्यायालयाचा आदेश असताना पुन्हा बेकायदेशीर अतिक्रमण टपऱ्या टाकण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुख्याधिकारी तपसे यांनी तक्रार दिली. बार्शी जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी असून न्यायालय काय आदेश देणाऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिली आहे. ‘न्यायालयाची स्थगिती असताना आहे त्या जागीच पुन्हा अतिक्रमण धारक टपऱ्या टाकत असलेल्याची तक्रार शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. बुवा धनवे, सचिन गायकवाड, अजय खंडागळे व शेखर हेरकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.