करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथे पुन्हा बेकायदा वाळू उपसा सुरु झाला आहे. हा वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भाऊसाहेब मुरूमकर यांनी केली आहे. दरम्यान तलाठी विवेक कसबे यांनी बेकायदा वाळू उपसा झाल्याचा पंचनामा केला आहे.
बिटरगाव श्री येथे सीना नदीतून बेकायदा वाळू उपसा झाल्याप्रकरणी यापूर्वी पंचनामा झाला होता. त्यानंतर काही दिवस वाळू उपसा बंद होता. मात्र आता पुन्हा वाळू उपसा झाला आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सांगून देखील वाळू उपसा होत बंद होत नसल्याने गावात दोन गटात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पहाणे आवश्यक असल्याचे मुरूमकर यांनी म्हटले आहे.
मुरूमकर म्हणाले, बिटरगाव श्री हे गाव सीना नदीच्या कटावर आहे. मात्र येथून बेकायदा वाळू उपसा होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गेल्यावेळी वाळू उपसा झाला तेव्हा पंचनामा करण्यात आला होता. हा वाळू उपसा त्वरित बंद व्हावा म्हणून ग्रामपंचायतीने तत्काळ वाळू उपसा बंदचा ठराव करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान हा वाळू उपसा होत आहे. वाळू चोरांवर कारवाई होत नसल्याने त्यांना कायद्याची भिती राहिलेली नाही का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. हा वाळू उपसा त्वरित बंद झाला नाही तर आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (बातमीतील फोटो हा संग्रहित आहे.)