करमाळा (अशोक मुरूमकर) : कोर्टी ते करमाळा रस्त्यावर विहाळ एसटी स्टॅन्डजवळ बुधवारी (ता. २७) रात्री वऱ्हाडाचा पिकअप व ऊसाचा ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात ६५ वर्षाची एक महिला ठार झाली आहे. तर १४ जण जखमी झाले आहेत. त्यातील तेघेजण गंभीर आहेत. सुरेखा बारीकराव उबाळे (रा. आंबी, ता. भूम, जि. धाराशिव) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
आंबी येथील १५ जण एका पीकपमध्ये पुणे (आळंदी) येथे विवाह सोहळ्याला गेले होते. तेथून गावी परतत असताना विहाळ येथे ऊसाचा ट्रॅक्टर आणि पीकप यांच्यात रात्री साडेअकराच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील महिला ठार झाली. सिराज नूर मोहम्मद शेख (वय ३०), प्रकाश भोसले (वय ६०), शिवाजी रामभाऊ भोसले (वय ४५), सुमन मुरलीधर गटकळ (वय ५०), बाबासाहेब गोरख गटकळ (वय ३५), राजाबाई सौदागर गटकळ (वय ६०), पोपट मल्हारी भोसले (वय ७३), सविता रामदेव भोसले (वय ७०), दादा राजू भोसले (वय ७५), संगीता आबासाहेब भोसले (वय ५०), इब्राहिम अब्दुल शेख (वय ५०), सुनील शंकर भोसले (वय ४५), कीर्ती शिवाजी भोसले (वय १८) व सुरेखा शिवाजी गटकळ (वय ४५, सर्व रा. आंबी, ता. भूम, जि. धाराशिव) अशी जखमींची नावे आहेत. अपघात झाल्याची माहिती समजताच विहाळ व वीट येथील नागरिकांनी मदत केली.