करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणात वादळी वाऱ्यात बोट उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्या सहाजणांचे ३६ तासानंतर पाण्यात तरंगताना मृतदेह सापडले. त्यानंतर सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघांवर कुगाव व चौघांवर झरेत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपुर्ण करमाळा तालुका दुःखात बुडाला असून सर्वत्र या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रांताधिकारी प्रियंका अंबेकर व तहसीलदार शिल्पा ठोकडे उपजिल्हा रुग्णालय व कुगाव येथे उपस्थित होते. करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर व डॉ. राहुल कोळेकर व करमाळा पोलिस यांनी शासकीय प्रक्रिया पूर्ण केली.
उजनी जलाशयात मंगळवारी (ता. २१) सायंकाळी कुगाव येथून कळशीकडे जाणारी प्रवासी बोट उलटली होती. वादळी वाऱ्याने उलटल्या या बोटीत चालकासह सातजण होते. त्यातील एकजण पोहत बाहेर आला होता. त्यानंतर बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध एनडीएफचे पथक व मच्छीमारांची बोटने तपास सुरु होता. दरम्यान अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय २८ बोट चालक), आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव धनंजय डोंगरे (वय २४, दोघे रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), गोकुळ जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३) व शुभम गोकुळ जाधव (दिड वर्ष, सर्व रा. झरे, ता करमाळा) यांचे मृतदेह सापडले. मृतदेहाचे शवविच्छेदन करून चौघांवर झरेत तर दोघांवर कुगावामध्ये अंत्यसंस्कार झाले.
ऑईल पाण्यावर आल्याने वाऱ्याने उलटलेली बोट सापडली! २४ तासानंतरही उजनीत बेपत्ता झालेल्या सहा व्यक्तींचा शोध सुरूच
झरे येथे जाधव परिवारातील चौघांना एकाच सरणावर भाऊ हनुमंत यांनी अग्नी दिला. त्यांना घरापासून दोन तिरड्यांवर मराठी शाळेच्या मागे असलेल्या स्मशानभूमीत नेले. एका तिरडीवर वडील व मुलगा तर दुसऱ्या तिरडीवर आई व मुलगी होती. एकाच सरणांवर त्या चौघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आणखी किती बळी जाणार! उजनीत यापूर्वीही उलटली होती बोट, कधी काय झाले पहा?
कुगाव येथे अवघडे यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. तर डोंगरे यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार झाले. प्रथम अवघडे यांच्यावर तर व नंतर डोंगरे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. दोन्हीही अंत्यसंस्कारावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिक यावेळी उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार संजयमामा शिंदे यांचे चिरंजीव यशवंत शिंदे उपस्थित होते.
उजनी धरणातील बोट अपघात घटना : शवविच्छेदनासाठी मृतदेह करमाळ्यात आणले जाणार