करमाळ्यात राष्ट्रवादीची ‘झेडपी’, पंचायत समितीला स्वबळाची तयारी!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीचे १२ गण व जिल्हा परिषदेच्या ६ गटात राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून यासाठी उमेदवार चाचपणी सुरु असून प्रत्येक गणात आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मत जाणून घेतली जात आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांनी दिली आहे.

माजी आमदार शिंदे यांनी आज (शनिवार) पांडे, रावगाव, वीट व फिसरे गणात गावभेट दौरा केला. बोरगाव येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘गेल्या निवडणुकीत युतीसाठी गाफील राहिल्याने शिंदे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणुकीला समोर जावे, आपली तालुक्यात ताकद आहे, नेत्यांनी योग्य निर्णय घ्यावा आणि ही निवडणूक स्वबळावर लढावी,’ अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

माजी आमदार शिंदे यांनी यावेळी इच्छुक उमेदवारांशीही संवाद साधून माहिती घेतली आहे. ‘या निवडणुकीत आपण ताकदीने उतरणार असून सर्वांना उमेदवारी देणे शक्य नाही. आपणच उमेदवार आहोत असे समजून प्रत्येकानी काम करावे. उमेदवारी कोणाला देईची हा निर्णय ठरवला जाईल. मात्र सर्वांनी कामाला लागावे’, असे आवाहन शिंदे यांनी केले.

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना आणि आमदार असतानाही तालुक्यातील प्रत्येक गावात विकास निधी दिला. त्यात कधीही राजकारण केले नाही. मात्र आता आपल्याला विजय आवश्यक असून सर्वांनी उमेदवार विजयी करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, असेही म्हणाले. आढावा बैठकीवेळी डॉ. विकास वीर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *