करमाळा (सोलापूर) : मराठा व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला आहे. एसटी, एससी व एनटी प्रवर्गाप्रमाणे आता ओबीसी व मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती मिळणार आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी हा निर्णय घेतला असल्याने हा दिलासा मानला जात आहे, असे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.
प्रा. झोळ म्हणाले, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर वस्तीगृह भत्ता मिळावा म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रिमंडळात मंजुरी घेतली. मराठा व ओबीसी समाजाला आरक्षणाबरोबरच शैक्षणिक सोयी सवलती दिल्या तर खऱ्या अर्थाने त्या गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. आरक्षणाबरोबरच शैक्षणिक सोयी सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना वस्तीगृह भत्ता मिळणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने आपण एसटी, एससी व एनटी प्रवर्गाप्रमाणेच मराठा व ओबीसी विद्यार्थ्यांनाही वस्तीगृह भत्ता मिळावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे विश्वासू मंगेश चिवटे व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यामार्फत वांरवार पाठपुरावा करत होतो.
पुढे बोलताना प्रा. झोळ म्हणाले, सरकार निर्णयानुसार सदरचा लाभ यावर्षी शिकत असलेल्या व वस्तीगृहात राहत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये संपूर्ण फी माफी देण्याबाबतही त्यांनी मागणी केली होती. याबाबत सरकार सकारात्मक प्रतिसाद देत असून नोव्हेंबरमध्ये मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या चंद्रकांत पाटील समितीने ईडब्ल्यूएस व ओबीसी प्रवर्गामधील मुलींसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये संपूर्ण फी माफी करण्याबाबत व त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्याबाबत शासनास शिफारस केलेली आहे.