Jagtap group again Banners flashed in Karmalaकरमाळ्यात झळकलेले बॅनर

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदारसंघात जगताप गटाची भूमिका महत्वाची राहणार आहे. निवडणुकीसाठी या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जगताप गटाचे करमाळ्यात झळकलेल्या बॅनरवरून राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हे बॅनर लावले असले तरी यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
करमाळा तालुक्यातील सोसायट्या बंद पडण्याच्या मार्गावर

काय आहे बॅनर?
नवरात्रोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा! ‘विकासाचे वचन करमाळकरांना… विश्वास जुना, जगताप गट पुन्हा’ असा मजकुर या बॅनरवर आहे. त्यावर देशभक्त स्व. नामदेवराव जगताप, माजी आमदार जयवंतराव जगताप व युवा नेते शंभूराजे जगताप यांचे फोटो आहेत. याशिवाय करमाळ्याचे आराध्यदैवत श्री कमलाभवानी देवीचा फोटो आहे.
Video : २०-२० वर्षाचं धुणंय सगळं धुणार थोडा वेळ लागेल म्हणत आमदार शिंदे यांनी मांडली पाच वर्षातील महत्वाची कामे

जगताप गटाबद्दल थोडक्यात
करमाळ्याच्या राजकारणात जगताप गट हा महत्वाचा आहे. स्व. नामदेवराव जगताप यांची एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका होती. राष्ट्रवादीचे शरद पवार हे नेहमी त्यांची आठवण सांगतात. जिल्ह्यात जेव्हा त्यांचा दौरा असतो तेव्हा प्रत्येक सभेत जगताप यांच्या कामाचा ते उल्लेख करतात. या गटाचे नेतृत्व सध्या माजी आमदार जयवंतराव जगताप हे करत आहेत. करमाळा विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यांनी अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

जगताप सध्या आमदार शिंदे यांच्याबरोबर आहेत का?
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी गेल्या निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांना पाठींबा दिला होता. आमदार शिंदे यांच्या बॅनरवर जगताप यांचा फोटो कायम वापरला जातो. कार्यक्रम पत्रिकेतही त्यांचा उल्लेख असतो मात्र काही दिवसांपासून ते कार्यक्रमांना हजर राहत नाहीत असे दिसत आहे. त्यावरून जगताप हे आमदार शिंदे यांच्याबरोबर आहेत का? हा प्रश्न केला जातो आहे.

काही दिवसांपूर्वी जगताप व अजित पवार यांची भेट
करमाळा येथे नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला होता. त्यावेळी माजी आमदार जगताप यांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव होते मात्र तेदौऱ्यात दिसले नाहीत. दरम्यान एका ठिकाणी त्यांची व पवार यांची भेट झाल्याच्या फोटोसह वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावरून आमदार शिंदे हे अपक्ष राहणार असतील तर जगताप यांना महायुतीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. किंवा पुन्हा आमदार शिंदे यांच्याबरोबरच काम करा अशी चर्चाही झाली का? असा प्रश्न तयार होत आहेत.

निवडणूक लढवण्याबाबत जगताप गटाची भूमिका
करमाळा विधानसभा निवडणुक लढण्यासाठी युवा नेते शंभूराजे जगताप इच्छुक होते. मात्र काही दिवसांपूर्वी माजी आमदार जगताप यांनी याबाबत भूमिका मांडत आताच निवडणुकीत न उतरण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान या निवडणुकीत जयवंतराव जगताप यांनीच उतरावे, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर शंभूराजे जगताप यांची भाजपमधून हाकलपट्टी झाली होती. त्यावर खचून न जाता त्यांनी जगताप गटासाठी जोरदार काम सुरु केले. आणि गट वाढवण्यासाठी प्रयत्न केले. या गटावर लोकांचा विश्वास आहे. त्यातच विश्वास जुना, जगताप गट पुन्हा असा उल्लेख बॅनरवर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

तुम्हाला काय वाटते?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जगताप गटाचे बॅनर चर्चेत आले आहे. त्यावरील मजकूर आणि गेल्या काही दिवसांपासूनची जगताप गटाची भूमिका यावर तुम्हाला काय वाटते? नेमके जगताप गटाने काय निर्णय घेतला पाहिजे आम्हाला कळवा. लोकसभा निवडणुकीवेळी माजी आमदार जगताप यांची शरद पवार यांनी भेट घेतली होती. मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांच्याशी काही दिवसांपासून त्यांची जवळीक वाढली असल्याचे बोलले जात आहे. मात्र तरीही अधिकृतपणे जगताप गटाची भूमिका काय असेल हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *