करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील कामोणे, जातेगाव, वीट, कोर्टी, कुंभारगाव व सावडीतील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या भागात कुकडी प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून (शुक्रवार) सुरु झाले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील नियोजनाप्रमाणे हे आवर्तन सुरू होणार असून यामध्ये करमाळा तालुक्याला दहा दिवस पाणी दिले जाणार आहे. हे पाणी सात दिवसानंतर करमाळा तालुक्यात पोहोचेल, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
आमदार शिंदे म्हणाले, सदर रब्बी आवर्तन 40 दिवस चालणार आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्यात पाणी पोहोचण्यासाठी सात दिवसाचा वहन कालावधी अपेक्षित आहे. पाणी वाटप नियोजनानुसार करमाळा तालुक्यासाठी 10 दिवस असणार आहेत. तर कर्जत तालुक्यासाठी 12, श्रीगोंदा तालुक्यासाठी 8 व नारायणगावसाठी तीन दिवस पाणी मिळेल. करमाळा तालुक्यातील कामोणे, जातेगाव, वीट, कोर्टी, कुंभारगाव, सावडी आदी गावातील तलाव, बंधारे भरण्यास मदत होणार आहे.