फुटलेल्या तरडगाव बंधाऱ्यातून जाता न आल्याने जयंत पाटलांचा शेतकऱ्याशी फोनवरून संवाद! व्यथा मांडताना महिलेला अश्रू अनावर

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आलेल्या पुरामुळे तरडगाव बंधारा फुटला आहे. यात शेतीचेही मोठे नुकसान झाले असून याची काल पहाणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. तेव्हा तरडगावकडून आलेल्या पाटील यांना बिटरगाव श्री येथील शेतकऱ्यांची भेट घेता आली नाही. त्यांनी अशोक मुरूमकर यांच्या मोबाईलवरून या शेतकऱ्यांशी संपर्क साधला. डोळ्याने दिसत असतानासुद्धा फुटलेल्या बंधाऱ्यामुळे जवळ जाता येत येत नसल्याने शेतकरी महिलेला फोनवर बोलताना अश्रू अनावर झाले. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला.

सीना नदीला आठवड्यात दुसऱ्यांदा आलेल्या पुरामुळे कोल्हापूर पद्धतीचा तरडगाव लघु पाटबंधारा वाहून गेला. वेळीच पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष दिले असते तर हा बंधारा वाचला असता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही येथील पहाणी केली होती. पहिल्यांदा आलेल्या पुराचे फुरसान काढले नाही, जेथे जमीन खचली होती तेथे मुरूम टाकला नाही. यामुळे बांधाराही फुटला आणि शेतीचेही मोठे नुकसान झाले.

पाटील यांनी सीना नदी काटावरील निलज, संगोबा व तरडगाव येथे भेट दिली. तरडगाव बंधाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला बिटरगाव श्री येथील शेतकरी आहेत. त्यांची शेती या बंधाऱ्यामुळे उध्वस्त झाली आहे. नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पाटील आणि शेतकरी यांच्यात साधारण ७० फूट अंतर होते. त्यातून पाणी वाहत होते. मोठे भगदाड पडले असल्याने तेथून पुढे जाता येत नव्हते. पाण्याच्या प्रवाहाच्या आवाजामुळे एकमेकांना आवाज येत नव्हता. त्यामुळे मुरूमकर यांनी बिटरगाच्या शेतकऱ्यांना फोन लावून दिला. त्यावर पाटील यांनी संवाद साधला.

‘तुम्हाला आमदार नारायण पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून पाठपुरावा करत पाटबंधारे विभागाकडून मदत मिळवून दिली जाईल’, असे आश्वासन माजी मंत्री पाटील यांनी नुकसानग्रस्त महिलेला दिले. यावेळी राष्ट्रवादीचे संतोष वारे, आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, संचालक डॉ. अमोल घाडगे, संचालक रविकिरण फुके, अमरजित साळुंके, सचिन नलवडे, अवधूत घाडगे, प्रवीण घोडके, ऍड. प्रशांत बागल, युवराज देवकर, बापूराव मुरूमकर, गोकुळ बाबर, भारत माने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *