करमाळा (सोलापूर) : गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न व गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर करमाळा शहरात कारवाई सुरु आहे. यातून ४२ वाहनांवर कारवाई करत १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अपघात टाळण्यासाठी पालकांनी अल्पवयीन मुलांना गाडी देऊ नये व कर्णकर्कश हॉर्न वाजवून नागरिकांना त्रास देऊ नये, असे आवाहन करण्यात आले असून वाहतूक नियम मोडणारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहरात अल्पवयीन मुलांचे मोटरसायकल चालवण्याचे व रेसिंग करण्याचे प्रमाण वाढल्याने कारवाई सुरु आहे. कर्णकर्कश हॉर्न व रेसिंग बाईक यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत आदेश केल्याने करमाळा वाहतूक शाखा, शहर बीट व निर्भया पथक यांनी एकत्रित कारवाई केली आहे. 42 वाहन चालकावर कारवाईकरून १ लाख ३ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच आवाज मारणारे सायलेन्सरही काढण्यात आले आहेत.
वाहतूक अंमलदार प्रदीप जगताप व दीपक कांबळे, निर्भया पथकातील अंमलदार पोलिस हवालदार शहाजी डुकरे, पोलिस कॉन्स्टेबल संभाजी पवार, गणेश गुटाळ, दादा गायकवाड, करमाळा शहर बीटमधील पोलिस हवालदार भाऊराव शेळके आदींनी ही कारवाई केली आहे.